मसाला बनविण्यासाठी महिलांची लगबग

तळा बाजारपेठेत मिर्ची खरेदीला वेग

| तळा | वार्ताहर |
उन्हाळा सुरू झाला की गृहिणी स्वयंपाकासाठी लागणारा मसाला बनविण्याच्या तयारीला लागतात. तळा तालुक्यातील महिलांचीही घरगुती मसाला बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यासाठी तळा बाजारपेठेत मसाला बनविण्यासाठी लागणार्‍या शंकेश्‍वरी, बेडगी, गंटूर, तेजालवंगी व रेलीज जातीच्या मिरची खरेदीला वेग आला आहे.

साधारणतः मार्च ते एप्रिल महिन्यात गृहिणींची मसाला बनविण्याची लगबग सुरू होत असे. मात्र, ऐन हंगामामध्ये मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला तीन ते चार वेळा उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धणे, बडीशोप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. गावाला बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते हे माहीत असल्याने हल्ली मुंबईला राहणारे चाकरमानीदेखील गावाला असलेल्या आपल्या नातेवाईकांकडून मसाला बनवून घेतात. त्यामुळे एक महिना आधीपासूनच गृहिणींची मिरची खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे.

मसाल्याची साहित्यांचे बाजारातील भाव
शंकेश्‍वरी-290 ते 300 रु.किलो
बेडगी-600 ते 700 रु.किलो
गंटूर -280 रु.किलो
रेलीज-300 रु.किलो
तेजा लवंगी-280 रु.किलो
मिक्स गरम मसाला-200 रु.पाव किलो
इंदोर धणे-140 ते 170 रु.किलो
साधे धणे-120 रु.किलो
बडीशोप-240 रु.किलो

Exit mobile version