‌‘कनकसंध्या’तून कोकण संस्कृतीचे दर्शन

| कणकवली | वृत्तसंस्था |

कणकवली पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस कणकवलीकरांनी गाजवला. 300 कलावंतांचा सहभाग असलेल्या ‌‘कनकसंध्या’ या कार्यक्रमातून कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडले. गायन, वादन, नृत्य यांचा अनोखा मिलाफ असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणीच ठरला. रंगकर्मी सुहास वरुणकर आणि लोककलावंत प्रा. हरिभाऊ भिसे यांनी निर्मिती केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद मिळाली.

कार्यक्रमात पदर महिला प्रतिष्ठानने भारतातील विविध प्रांतांत लोकसंस्कृतीचे नृत्य व मुलांमध्ये जाणीव करून दिली. यामध्ये गुजराती, राजस्थानी दक्षिण प्रांतातील तसेच कोकण प्रांतातील संस्कृती नृत्यातून दाखवली. जिल्हा परिषद शाळेतील व अन्य प्रशालांमधील लहान मुलांनी उत्कृष्ट नृत्य आविष्कार सादर केले. आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दक्षिण भारतातील वेशभूषा सादर करून त्या प्रांतांमधील विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. ‌‘झुंजुमुंजु सांज झाली’, या गाण्यावर नृत्य सादर करून कोकणातील संस्कृती दाखवली. प्रभू श्रीराम यांची वेशभूषा केलेल्या प्रमुख कलावंतांसह इतर 300 कलावंत सिंधुगर्जना ढोलपथकाच्या निनादात रंगमंचावर पोहोचले आणि ‌‘कनकसंध्या’ कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर नांदी झाली. नंतर नटरंग गाण्यावरील नृत्याविष्कार आणि चिमणी पाखरे ग्रुपने केलेले ‌‘गणपती’ नृत्य याला रसिकांची मोठी दाद मिळाली. त्यानंतर धीरेश काणेकर आणि नेहा यांनी देवा तुझ्या दारी आणि केवड्याचं पान ही गाणी सादर केली. तर संजय पेटकर दिग्दर्शित चिमुकल्यांनी केलेल्या नृत्याविष्कारानेही कार्यक्रमात धम्माल उडवून दिली.

Exit mobile version