युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी

शेकापतर्फे मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील यांच्यावतीने भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे अलिबाग, रोहा आणि मुरुड येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील आढावा बैठक शेतकरी भवन, अलिबाग येथे चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर रोजगार मेळावा पूर्णपणे मोफत होत असून, पीएनपी महाविद्यालय वेश्‍वी-अलिबाग, व्ही.एन. महाविद्यालय मुरुड, सानेगाव हायस्कूल, रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे.

मोफत भव्य रोजगार मेळावा आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की, समाजात आज सर्वात मोठा भेडसवणारा प्रश्‍न हा बेरोजगारी आहे. काहींचे काही कारणास्तव कमी शिक्षण झाल्यामुळे ते बेरोजगार आहेत, तर काही उच्च शिक्षित असूनही बेरोजगार आहेत. पण, त्यांना आज कामाची खूप गरज आहे. काही वेळा एखाद्या कंपनीमध्ये भरती असेल तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जात नाही. त्यामुळेच त्यांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी शेकापने जॉब कनेक्टच्याद्वारे या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

रोजगार मेळावा एप्रिलमध्ये दि.10 रोजी अलिबाग, दि.11 रोजी मुरुड आणि दि.12 रोजी रोहा येथे होत असून, सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आयोजित केला आहे. ज्या कोणाला रोजगार मेळाव्यात सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी स्वयंसेवकांकडून फॉर्म घेऊन तो व्यवस्थित भरून त्याला आपला बायोडेटा जोडून मेळाव्याच्या दिवशी सोबत आणायचा आहे. उमेदवाराने येताना मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत आणायच्या आहेत. या मेळाव्यात 40 ते 50 विविध क्षेत्रातल्या कंपन्यांचा सहभाग असणार आहे. आठवी शिक्षण ते पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन, नर्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, सिक्युरिटी टेलिकॉम, आय.टी., बीपीओ, किपीओ, फार्मा व इतर जॉबसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी मिळणार आहे. सर्वांसाठीच ही एक सुवर्णसंधी असणार आहे. त्याचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता स्वयंसेवकांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

सुरुवातीच्या एका तासात अर्जदारांची नोंदणी केली जाईल, त्यानंतर जे टोकन दिलं जाईल, त्यानुसार त्या त्या काऊंटरला जाऊन मुलाखत द्यायची आहे. त्यामुळे मेळावा जरी 10 वाजता चालू होणार असला, तरी इच्छुकांनी 9 वाजता मेळावास्थळी ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे, असे आवाहन जॉब कनेक्टचे एम.डी. आर.एम. गायकवाड, सीईओ ओमकार पवार आणि प्रवीण देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version