| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील बरडा वाडी येथे साकव ग्रामविकास संस्था व अनामिका महिला महासंघाच्यावतीने शनिवारी (दि.3) क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पेण व रोहा तालुक्यातील बचत गटांतील महिलांचा भव्य मेळावा घेण्यात आला. हा मेळावा जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्याला सर्व स्तरातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना चालना देणे व त्यातूनच महिलांना पुढे येण्याची संधी प्राप्त होणे ही आजच्या काळाची गरज आहे. मी सर्व सामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दर आठवड्याला दोन गाव वाड्यातील सरपंच, महिला, युवा, शेतकरी व सर्वसामान्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संपर्क साधतो. व त्यांच्या समस्या जाणनू घेऊन त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. ते पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात शेतीचे प्रमाण कमी असले तरी ही शेती नाविन्यपूर्ण करणे गरजेचे आहे. आदिवासींना प्राप्त झालेल्या वन जमिनीत भाजी मळे करून उपजीविका वाढीचा प्रयत्न केला पाहिजे. नुकताच काही ठिकाणी आदिवासींना होड्या दिल्या आहेत. यावर ते आपली उपजीविका करतात. रायगड जिल्ह्याच्या जवळ मुंबई बाजारपेठ आहे. त्याचा फायदा बचत गटातील महिला कोकण रेल्वे मध्ये आपला माल विक्री करीत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी आपली क्षमता वाढविली पाहिजे, असे सांगताना त्यांनी साकवच्या कार्याची स्तुती केली. या कार्यक्रमाला जिल्हािधिकारी यांच्यासह पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, डॉ. निशिगंधा पोळ, अश्विनी गलांडे, साकव संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे, कृषी अधिकारी व इतर मान्यवर तसेच मोठ्या संख्येने आदिवासी उपस्थित होते.







