स्मशानभूमी बनलेय जेवण बनवण्याचा अड्डा

| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरातील मठाच्या स्मशानभूमी जवळ दशक्रिया व पिंडदान विधीसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. याच जागेमध्ये अवधूताचे जागृत देवस्थान देखील आहे. सदरची जागा अगोदर ओबडधोबड होती. परंतु यावर्षी नगर परिषदेने त्या ठिकाणी डांबरीकरण करून घेतल्याने सदरची जागा आता खूप मोठ्या मैदानाप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी किंवा पिंडदानासाठी येणार्‍या नागरिकांना बसण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होत आहे. त्या ठिकाणी दशक्रिया विधी व पिंडदान केले जात असल्यामुळे नगर परिषदेने एक पाण्याची टाकी ठेवून त्याच्यामध्ये नळाचे कनेक्शन देखील दिलेले आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध असते. याच गोष्टीचा फायदा पर्यटकांकडून घेतला जात आहे. शहरात येणारे अनेक पर्यटक तसेच शाळांच्या सहली याच ठिकाणी आपल्या गाड्या उभ्या करून जेवण बनवताना पाहायला मिळतात. तसेच जेवण बनवून झाल्यानंतर सदर जागेमध्ये बसून भोजनाचा आनंद देखील घेताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जेवण बनवले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा देखील पडत असतो. दुसर्‍या दिवशी एखाद्या नागरिकाचा दशक्रिया विधी असल्यास त्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना कचरा साफ करावा लागतो. तरी नगर परिषदेने त्या ठिकाणी सूचना फलक लावून गाड्या उभ्या करण्यास व जेवण बनवण्यास सक्त मनाई करावी. अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version