शंकर गुरव यांच्या प्रयत्नांना यश
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्या विशेष प्रयत्नाने आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून, या उपकेंद्राचे भूमिपूजन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक यांच्या हस्ते सोमवारी (दि.5) करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त गावातील सेवानिवृत्त व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
आक्षी गावाची लोकसंख्या सुमारे 2 हजार 900 असून, गावात मासेमारी नौकांवर, हॉटेल, कॉटेज तसेच विविध रोजगारासाठी सुमारे 2 हजार 500 नागरिक इतर जिल्ह्यातून व परराज्यातून आले आहेत. यामुळे गावात सरकारी दवाखाना असावा अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. शंकर गुरव यांनी याबाबत शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत, आक्षी येथे उपकेंद्र मंजूर करून घेतले. या उपकेंद्रासाठी अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार असून, या इमारतीचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले.
यावेळी शिवसेना ठाकरे गट जिल्हा सल्लागार सतीश पाटील, प्रशांत मिसाळ, अजित पाटील, कृष्णा कडवे, धनंजय गुरव, स्नेहल देवळेकर, रश्मी पाटील, आनंद बुरांडे, संदिप पालकर, श्वेता पालकर, अश्लेषा नाईक, हरिश्चंद्र नाखवा, हरिश्चंद्र बामजी, वासुदेव नाखवा, सुनील नाईक, नेहा नाईक, विष्णू बानकर, अरुण ठाकूर, नागेश पेरेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते, मोठे मोठे पूल यालाच आपण विकास समजतो. मात्र खरा विकास शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामगिरीतून होत असतो सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. गावातील आरोग्य सेवेतील गरज ओळखुन शंकर गुरव यांच्या प्रयत्नाने गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. या उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
-प्रसाद भोईर
शिवसेना ठाकरे गट जिल्हा संपर्कप्रमुख
गावात आरोग्य केंद्राची उणीव होती. ही उणीव शंकर गुरव यांच्या प्रयत्नांनी भरून निघणार आहे. नागरिकांना गावात स्वस्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. या आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिल्यानंतर येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित राहतील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू.
-द्वारकानाथ नाईक
माजी जिल्हा परिषद सदस्य







