रायगडच्या वन स्टॉप सेंटरचा मदतीचा हात; अत्याचारग्रस्त लेकीला दिला जगण्याचा आधार
| अलिबाग | प्रतिनिधी |
सासरी होणाऱ्या अमानुष अत्याचारांनी जगण्याची आशाच हरवलेल्या एका विवाहितेला रायगडच्या वन स्टॉप सेंटरने नवजीवन दिलं. बहिणीच्या एका आर्त फोननंतर रायगड ते उत्तर प्रदेश असा समन्वय साधत अखेर त्या लेकीला अत्याचाराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका तरुणीचं आयुष्य मात्र सासरी सुरू झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे उद्ध्वस्त झालं. मदतीची सर्व दारं बंद झाल्याचं वाटत असतानाच तिच्या बहिणीने रायगडच्या वन स्टॉप सेंटरला एक आर्त फोन केला… आणि इथूनच सुरू झाला आशेचा नवा प्रवास.
रायगडच्या वन स्टॉप सेंटरने क्षणाचाही विलंब न करता पीडितेची माहिती घेत उत्तर प्रदेशातील वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधला. दोन्ही राज्यांतील यंत्रणांनी समन्वय साधत पीडितेच्या घरी भेट दिली. सुरुवातीला समुपदेशन आणि समेटाचा प्रयत्न झाला. मात्र, अत्याचार थांबत नसल्याचं लक्षात येताच पुन्हा तातडीने कारवाई करण्यात आली.
अखेर सासरच्या छळातून त्या महिलेची सुरक्षित सुटका करून तिला सुखरूप रायगडमध्ये तिच्या माहेरी आणण्यात आलं. एका बहिणीची हाक, दोन राज्यांतील यंत्रणांचा समन्वय आणि वन स्टॉप सेंटरची संवेदनशीलता यामुळे एका लेकीला नव्याने जगण्याची संधी मिळाली. आजही अनेक महिला अत्याचार सहन करत गप्प राहतात. मात्र, वेळेवर मागितलेली मदत आणि संवेदनशील यंत्रणेची साथ मिळाली, तर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडू शकतो, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोहिनी वाघमारे, स्वाती म्हात्रे आणि सारिका पाटील यांची साथ लाभली.
पीडित
आमच्या मुलीला परत पाहण्याची आशाच संपली होती. पण, वन स्टॉप सेंटरने आम्हाला धीर दिला, मुलीला सुरक्षित घरी आणलं. आमच्यासाठी त्यांनी देवदूतासारखं काम केलं. आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू.
कोणतीही महिला अत्याचार सहन करत असेल तर तिने गप्प बसू नये. वन स्टॉप सेंटर तिच्या मदतीसाठी 24 तास तत्पर आहे. योग्य वेळी माहिती मिळाल्यास अशा अनेक महिलांना सुरक्षित आयुष्य मिळवून देता येऊ शकतं.
वन स्टॉप सेंटर समुपदेशक
