पूरग्रस्तांना जेएसएमतर्फे मदतीचा हात

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी जे. एस. एम. कॉलेज, अलिबागच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पूरग्रस्तांना विविध स्वरूपात मदत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना व नागरिकांना करण्यात आले होते. या आवाहनास उत्तम प्रतिसाद देऊन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व नागरिक यांनी वस्तू, अन्नधान्य, कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू व आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.
गोळा झालेल्या वस्तू व रक्कम यातून तांदूळ, डाळी, साखर, चहा, गोडेतेल, साबण, बिस्किटे इत्यादी जिवनावश्यक वस्तूंचे एकूण 60 पॅक, पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट, चादरी, औषधे एकत्र करून मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडे पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड, डॉ. सौ. मिनल पाटील, डॉ. सुनील आनंद हे यावेळी उपस्थित होते. मदत गोळा करण्यासाठी रा.से.यो. स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. मदत केलेल्या सर्वांचे महाविद्यालयातर्फे आभार मानण्यात आले.

Exit mobile version