11 अॅप्समधून निवडणुकीवर नजर; मनुष्यबळावरील ताण होणार कमी
। रायगड । सुयोग आंग्रे ।
समाजमाध्यमांच्या वापरासह विविध हायटेक अॅप वापरण्याकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. हाच धागा पकडत यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांसह उमेदवारांसाठी विविध अॅप्सची निर्मिती केली आहे. अॅपच्या माध्यमातून उमेदवाराला आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व इत्थंभूत माहिती मिळणार आहे. प्रचार सभेसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेसह सुविधा अॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनालादेखील उमेदवारांची व त्यांना आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचार वाहनाच्या परवानग्या, सभेसाठी जागेची परवानगी, यासह विविध परवानग्यांसाठी पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात पायपीट करावी लागत असे. तसेच या परवानग्या घेताना वेळ व मनुष्यबळ अधिक खर्ची पडत होते. या सर्व बाबींचा विचार करता, सध्याच्या घडीला समाजमाध्यमांसह तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेदेखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञांचा अधिक वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच आता ही प्रक्रिया सोपी करणे व मनुष्यबळावरचा ताण कमी करण्यासाठी निवडणूकविषयक विविध अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपमुळे मनुष्यबळावरील ताण कमी होणार आहे. तसेच वेळ वाचण्यास मदत होणार आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, यामुळे मनुष्यबळावरील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
एन्कोर अॅप उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र, प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सुविधा दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांना आलेले उमेदवारी अर्ज स्वीकृत, अस्वीकृत करणे, झालेल्या मतदानाची माहिती संकलित करणे इत्यादी कामे या अॅपमार्फत केली जाणार आहेत.
सिव्हिजिल अॅप निवडणुकीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक या अॅपद्वारे त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडीओ शेअर करू शकतात. यात तक्रारदाराची ओळख जाहीर होत नाही. तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते.
क्नो युअर कॅन्डिडेट्स उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता इत्यादी माहिती नागरिकांना उपलब्ध होते.
वोटर हेल्पलाईन अॅप मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
इलेक्शन सिझ्युअर मॅनेजमेंट सिस्टीम अमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, रोख रक्कम इत्यादी जप्त केल्यावर डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे.
सुविधा अॅप उमेदवारांना निवडणूक कालावधीत निवडणूकविषयक विविध परवानगी मिळण्यासाठी उपलब्ध आहे.
सक्षम अॅप दिव्यांग मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे.
केवायसी अॅप या अॅपद्वारे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांची चारित्र्य तपासणी आणि गुन्ह्यांची माहिती तातडीने उपलब्ध होणार आहे.
एनव्हीएसपी पोर्टल अॅप या अॅपवर मतदारांना मतदानासंबंधित असणारी सर्व माहिती आणि मतदानाच्या सुविधांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
ईटीपीबीएस अॅप सैन्यदलात कार्यरत असणार्या मतदारांसाठी देण्यात येणार्या पोस्टल बॅलेट पेपर संबंधात हे अॅप काम करणार आहे. सैन्यदलातील मतदारांची मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे.
बीएलओ अॅप या अॅपला गरुडा अॅप संबोधले जाते. या अॅपवरून मतदान केंद्र अधिकारी त्यांना दिलेल्या कामकाजाची माहिती अद्ययावत करू शकतात.
ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम या यंत्रणेच्या माध्यमातून ईव्हीएमयंत्र आणि व्हीव्हीपट यंत्र याच्या माहितीबरोबर मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया पारदर्शक पार पडण्यास मदत करते.