भारतीय क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा

पुण्यात रंगणार बजाज ग्रँड टूर; पहिल्यांदाच युसीआय 2.2 सायकलिंग शर्यतीचे आयोजन

| पुणे | प्रतिनिधी |

भारतात पहिल्यांदाच युसीआय 2.2 दर्जाची बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही कॉन्टिनेंटल टीम्स मेन्स एलिट रोड सायकलिंग शर्यत आयोजित होत आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात ही स्पर्धा रंगणार असून आंतरराष्ट्रीय सायकलिंग कॅलेंडरची सुरुवात करणार आहे. तसेच, ही स्पर्धा चार टप्प्यांच्या बहुदिवसीय आव्हानातून ग्लोबल स्तरावरील प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. या स्पर्धेत जगभरातील 28 स्पर्धक संघांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामध्ये चार राष्ट्रीय संघांचा समावेश असून, भारताकडून ‌‘इंडिया अ’ आणि ‌‘इंडिया ब’ असे दोन राष्ट्रीय संघ उतरणार आहेत.

पुणे जिल्हा प्रशासनाने ‌‘कॉन्टिनेंटल टीम्स मेन्स एलिट रोड सायकलिंग शर्यत’ ही ऐतिहासिक क्रीडा संकल्पित केली असून महाराष्ट्र सरकारने ठाम पाठिंबा दिला आहे. ही शर्यत 437 किमीच्या मार्गावरून पुण्याच्या नागरी परिसरातून, वारसा-संपन्न स्थळांतून आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून प्रवास करणार आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये चार रोमांचक टप्पे असणार आहेत. त्यात जगातील अनुभवी सायकलपटूंच्या क्षमतेची कसोटी पाहता येणार आहे. या शर्यतीतील 437 किमी अंतर पार करताना शहरातील गतीमान वातावरण, सह्याद्रीच्या पायथ्याची शांतता, कठीण चढ, वेगवान सपाट रस्ते आणि ऐतिहासिक स्थळांतून जात स्पर्धकांच्या सहनशक्ती, रणनीती आणि कौशल्याला ताण देणार आहे. या उपक्रमातून जागतिक दर्जाचे सायकलिंग सादर करण्याबरोबरच प्रदेशातील पर्यटन, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे.

उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंदः जितेंद्र डुडी
पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रँड टूरचे प्रभारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या वर्षाला जगभरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. युनायटेड किंगडम, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड अशा प्रमुख सायकलिंग राष्ट्रांनी उत्सुकता दाखवली असून अनेकांनी सहभागही निश्चित केला आहे. युनियन सायक्लिस्ते इंटरनॅशनल भारतात सायकलिंग क्रीडेला प्रोत्साहन देण्यास अत्यंत उत्सुक आहे. पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग गंतव्य म्हणून उभे राहण्याची ही मोठी संधी आहे आणि आम्ही विश्वस्तरीय आयोजन करण्यास कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
चार टप्प्यांतील खडतर मार्ग

मुळशी-मावळ माइल्स(91.8 किमी) : पुण्याच्या आयटी हब हिंजवडीमधून जाणारा हा आरंभीचा टप्पा सपाट स्प्रिंट्स आणि शहरी वळणांचा संगम असून आधुनिकता आणि निसर्गाचा सुरेख मिलाफ दाखवतो.

मराठा हेरिटेज सर्किट (109.15 किमी) : पुरंदर किल्ला, सिंहगड आणि खडकवासला तलावाच्या दृष्टीसह अवघड घाट चढणारा हा टप्पा क्लाइंबिंग आणि सहनशक्तीची खरी परीक्षा आहे.

वेस्टर्न घाट्स गेटवे (137.07 किमी) : पुरंदरपासून बारामतीपर्यंतचा डेक्कन पठारावरील मार्ग वेग, रणनीती आणि क्रॉसविंड्समुळे अत्यंत स्पर्धात्मक ठरतो.

पुणे प्राईड लूप (99.15 किमी) : अंतिम टप्पा पुणे शहराच्या आधुनिक आणि ऐतिहासिक स्थळांतून शानीवार वाड्यासह जातो आणि शहराच्या मध्यभागात नाट्यमय फिनिशसह संपतो.
    Exit mobile version