| मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील आरे कॉलनी गेट क्रमांक 5 येथे गुरुवारी (दि.1) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सूमारास बेस्ट वेट लीज इलेक्ट्रिक बस आणि खासगी ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
विक्रोळी डेपोशी संलग्न असलेली A-478 (Sr.33) मार्गावरील बस विक्रोळी डेपो येथून बोरीवली स्टेशन (पूर्व) दिशेने जात असताना आरे कॉलनी मार्केटजवळ हा अपघात झाला. समोरून येणारा खासगी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसच्या चालक केबिनजवळील उजव्या बाजूला जोरात धडकला. या अपघातात ट्रक चालक चेहराज ठाकूर (30), रा. गुजरात यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात बेस्ट बस चालक मोहम्मद रफीक शेख (48) यांना डोक्याला, उजव्या पायाला व गुडघ्याला दुखापत झाली असून, काच फुटल्याने ते जखमी झाले. बस वाहक रवींद्र शेंबडकर (56) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांवर उपचार सुरू असून, बस चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. हा अपघात मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







