भारत – इंग्लंड टी 20 मालिक; भारताचा लाजिरवाणा पराभव

शेफाली वर्माची एकाकी लढत; स्मृती, जेमिमा अपयशी

| मुंबई | वृत्तसंस्था |

इंग्लंडचा महिला संघ भारतीय महिला संघावर पुन्हा एकदा भारी ठरला. आज झालेल्या पहिल्या ङ्गटी 20फ सामन्यात 197 धावा उभारणाऱ्या इंग्लंडने भारतीय संघावर 38 धावांनी मात केली. शेफाली वर्माने एकाकी लढत देत अर्धशतक केले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीयांच्या खेळात सातत्य नव्हते. पाहुण्या संघाची 2 बाद 2 अशी अवस्था केली; मात्र त्यांनी 197 धावा केल्या. भारतीयांकडून शेफाली वर्माने अर्धशतक केले, तर इतरांनी निराशा केली. 20 षटकांत भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भक्कम सलामीची गरज असताना स्मृती मानधना आणि तिसऱ्या क्रमांकावरील जेमिमा रॉड्रिग्ज यांनी निराशा केली, पण शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी कायम ठेवल्यामुळे भारताने पहिल्या सहा षटकांत 53 धावा फटकावल्या.शेफालीला कर्णधार हरमनप्रीत आणि रिचा घोष यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला; मात्र धावांची आवश्यक गती त्या राखू शकल्या नाहीत. त्यातही त्यांचे योगदान तिशी गाठू शकले नाही.

डॅनी वॅट आणि नॅट सिवर यांनी इंग्लंडचा डाव सावरलाच नाही; तर कमालीची आक्रमक फलंदाजी केली. 10 व्या षटकात त्यांनी संघाला 89 धावांपर्यंत मजल मारून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. भारतीय फिरकी गोलंदाज पदार्पण करणारी सैका इशाक आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांच्यावर ठरवून हल्ला करण्यात आला. दीप्तीच्या पहिल्या षटकात तर 10 धावा काढण्यात आल्या. पहिल्या षटकात मिळालेल्या यशानंतर भारताला पुढच्या गड्यासाठी 16 व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. वॅटने 75; तर सिवरने 77 धावांची खेळी केली. पदार्पण करणारी भारताची दुसरी गोलंदाज श्रीयांका पाटीलने दोन गडी बाद केले . अखेरच्या षटकांत ॲमी जोन्सने 9 चेंडूत 23 धावांचा तडाखा दिला.

वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने भारताला फारच चांगली सुरुवात करून दिली. नव्या चेंडूवर नेहमीच स्विंग करण्याची क्षमता असलेल्या रेणुकाने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर इंग्लंडची सलामीवीर सोफिया डंकले आणि एलिस कॅप्सी यांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक: इंग्लंड: 20 षटकांत 6 बाद 197 (डॅनी वॅट 75- 47 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार, नॅट सिवर 77- 53 चेंडू, 13 चौकार, ॲमी जोन्स 23- 9 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, अवांतर 10, रेणुका सिंग 4-0-27-2, श्रीयांका पाटील 4-0-44-2) विजयी वि. भारत 20 षटकांत 6 बाद 159 (शेफाली वर्मा 52- 42 चेंडू, 9 चौकार, स्मृती मानधना 6, जेमिमी रॉड्रिग्ज 4, हरमनप्रीत कौर 26- 21 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, रिचा घोष 21- 16 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, नॅट सिवर 4-0-35-1, एक्लेस्टोन 4-0-15-3).

Exit mobile version