घरच्याच मैदानावर राजस्थानने लोळवलं
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील वानखेडे मैदानावर सोमवारी (दि.1) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना झाला. एकापेक्षा एक नावाजलेले फलंदाज अशी भरभक्कम तटबंदी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या याच फलंदाजीचे बुरूज ढासळले आणि वानखेडे स्टेडियमवर राजस्थाविरुद्धच्या आयपीएल सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसर्या अपयशामुळे गुणफलकासमोरचा भोपळा कायम राहिला. या सामन्यात मुंबईच्या टॉप ऑर्डरची कामगिरी निराशाजनक होती. रोहित शर्मासह सुरुवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले तेथून सुरू झालेली पडझड 20 षटकांत नऊ बाद 125 धावांपर्यंत कायम राहिली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून दारूण पराभव केला आहे.
अगोदरच प्रेक्षकांचा विरोध सहन करणारा आणि संघाची फारच वाईट अवस्था अशा परिस्थितीत मैदानात येणार्या हार्दिकने दडपण उडवत सहा चौकारांसह 34 धावा केल्या. तिलक वर्मासह 36 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. संघाच्या फलंदाजीला पडलेले मोठे छिद्र बुजवण्याचा प्रयत्न केला; पण युझवेंद्र चहलच्या चेंडूवर उंच फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. तिलक वर्मा चहलच्या गुगलीवर चकला, त्यावेळी मुंबई इंडियन्सने सातवा फलंदाज गमावला, तोपर्यंत तीन अंकी धावाही खात्यात जमा झाल्या नव्हत्या. अखेर 15व्या षटकांत शंभरी गाठण्यात आली. टीम डेव्हिड आणि जेरार्ड कोएत्झी ही फलंदाजांची शेवटची मैदानात होती; पण त्यांचाही बार फुसका ठरला.
10 संघांच्या आयपीएलमध्ये इतर नऊ संघांनी एक तरी विजय मिळवला आहे. अपवाद मात्र पाच वेळा अजिंक्यपदाचा लौकिक असलेल्या मुंबईचा आहे. तिन्ही सामने गमावल्यामुळे गुणांचे खाते उघडलेले नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांची बेदम पिटाई झाली होती. आज राजस्थानविरुद्ध फलंदाजांनी शरणागती स्वीकारली. एकूणच मुंबई इंडियन्स संघाची वाताहत कायम राहिली.