श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव

। न्यूयॉर्क । वार्ताहर ।

आयपीएलमध्ये सुमार गोलंदाजीकरीत असलेल्या अ‍ॅनरिक नॉर्खिया याने दक्षिण आफ्रिकेला टी-20 विश्‍वकरंडकातील सलामीचा सामना एकहाती जिंकून दिला. त्याने सात धावांमध्ये चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेचा डाव 77 धावांमध्ये गुंडाळता आला. माफक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेने चार फलंदाज गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. दक्षिण आफ्रिकेने ड गटात विजयी सलामी देत दोन गुण कमवले.

श्रीलंकन संघ 77 धावांवर गारद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघासमोर मोठे आव्हान नव्हते; पण गोलंदाजांना साथ देत असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचीही तारांबळ उडाली. नुवान तुषाराने रिझा हेंड्रीक्सला चार धावांवर बाद केले. दासुन शनाकाने फॉर्ममध्ये नसलेल्या एडन मार्करमला तंबूत पाठवले. त्यानंतर कर्णधार वनिंदू हसरंगा याने क्विंटॉन डी कॉक (20 ) व ट्रिस्टन स्टब्स (13) यांना बाद केले; पण हेनरिक क्लासेन (नाबाद 19) व डेव्हिड मिलर (नाबाद 6) यांनी कोणतीही जोखीम न पत्करता दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Exit mobile version