अफगाणांचा लाजिरवाणा पराभव

पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक

। त्रिनिदाद । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकातील पहिला उपांत्य सामना गुरूवारी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदादच्या तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा लाजीरवाणा पराभव करत पहिल्यांदाच विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात खुपच खराब झाली. दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा संघ अवघ्या 56 धावांत गडगडला. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईने सर्वाधिक 10 धावा केल्या. उमरझाई हा संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज होता. बाकी 10 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून अतिशय धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी 3-3 बळी घेतले. याशिवाय रबाडा आणि एनरिकने प्रत्येकी 2 बळी घेतले. आफ्रिकन गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून बळी घेण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 11.5 षटकांत गडगडला.

दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. संघाने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा केल्या. अफगाणिस्तानचा गोलंदाज फजलहक फारुकीने क्विंटन डी कॉकचा लवकर बळी घेतला असला तरी कर्णधार एडन मॉर्कम आणि रीझा हेंड्रिक्स यांनी 43 चेंडूत 55 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. उपांत्य फेरीत नऊ गडी राखून विजय मिळवून दक्षिण आफ्रिका टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरत पहिल्यांदाच विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक
दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंतचा विश्‍वचषकातील प्रवास सोपा राहिलेला नाही. दक्षिण अफ्रिकेला आतापर्यंत उपांत्य फेरीत 7 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापुर्वी 1992 च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडकडून पराभव, 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव, 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव, 2009 मध्ये पाकिस्तानकडून पराभव, 2014 मध्ये भारताकडून पराभव, 2015 मध्ये न्यूझीलंडकडून त्याचा पराभव तसेच, 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
पराभवाला आयसीसी जबाबदार?
या सामन्यानंतर क्रिकेट तज्ज्ञ आणि समालोचकांनी आयसीसीवर प्रश्‍न उपस्थित करण्यास सुरुवात केली. दरम्यान इंग्लंडचा माजी महान क्रिकेटपटू मायकेल वॉनचे एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने सामना सुरू व्हायच्या आधी अफगाणिस्तान संघ दोन कारणांमुळे पराभूत होऊ शकतो असे सांगितले होते आणि तसेच घडले. अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी मायकेल वॉनने एक्स पोस्ट करताना लिहिले होते की, टी-20 विश्‍वचषकासाठी अफगाणिस्तान संघ सेंट व्हिन्सेंट येथून सोमवारी रात्री उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. त्यात त्यांच्या त्रिनिदादला जाणार्‍या विमानाला 4 तास उशीर झाला होता. त्यामुळे त्यांना सरावासाठी वेळ मिळाला नाही आणि नवीन जागेची सवयही झाली नाही. अशा प्रकारे त्याने नाव न घेता आयसीसीवर निशाणा साधला आहे, कारण आयसीसीने वेळापत्रक तयार केले आहे.
Exit mobile version