। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी उपोषण सुरू झाले आहे. धामोते गावातील ग्रामस्थ संजय विरले यांच्या घराकडे जाणार्या रस्त्याप्रकरणी चुकीचे उत्तरे देणे, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देऊन देखील कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान, संजय विरले यांच्या उपोषणाला शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे.
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील धामोते गावातील ग्रामस्थांच्या घराकडे जाणारा रस्ता अडविण्यात आला आहे. याचवेळी या रस्त्याच्या खुल्या जागेत घर बांधण्यासाठी संबंधित जागेची विक्री करण्यासाठी ना हरकत दाखला ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे. यामुळे नियमानुसार बाहेर जाऊन निर्णय घेणार्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी संजय विरले यांनी नेरळ-कळंब रस्त्यावरील साई मंदिर कोल्हारे फाटा येथे मंगळवारी (दि.8) उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.