सहा जणांना अटक
। मुंबई । वृत्तसंस्था ।
जुन्या वादातून सहा जणांच्या टोळीने एकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रालाही टोळीने मारहाण केली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरसीएफ पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
चेंबूरमधील मुकुंद नगर परिसरात सिद्धार्थ कांबळे (32) याच्यावर सहा जणांच्या टोळीने हल्ला केला. यावेळी त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र विकास धेंडे त्याला वाचवायला गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. तर, सीताराम जगतापने सिद्धार्थ कांबळेवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या सिद्धार्थला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हल्ल्यात विकास धेंडेही जखमी झाला आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.