Raigad Landslide: खोपोलीतील सुभाषनगरमध्ये दरड कोसळली

सुदैवाने जिवीतहानी टळली

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

खोपोली मधील सुभाषनगर परिसरातील डोंगराचा काही भाग रविवारी (दि.5) सकाळी कोसळला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, असाच पाऊस राहिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

सुभाषनगर हा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला दाट लोकवस्तीचा भाग आहे. सुमारे तीन ते साडेतीन हजार नागरिक या परिसरात राहत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये सातत्याने भीतीचे वातावरण असते. या समस्येबाबत स्थानिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संरक्षण भिंत उभारणे, ठिसूळ खडकांवर सुरक्षा जाळी बसवणे, डोंगराच्या उतारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. इर्शाळवाडी आणि माळीण येथील दुर्घटनांचा संदर्भ देत सुभाषनगरमध्ये ही अशाच प्रकारची गंभीर घटना घडू शकते, याची जाणीव करून दिली आहे. खोपोलीतील सुभाषनगरमध्ये झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Exit mobile version