| सुधागड-पाली | वार्ताहर |
मुसळधार पावसामुळे पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघजाई नगर येथे शुक्रवारी (दि. 21) दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित व आर्थिक हानी झालेली नाही. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहर सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. शिवाय किल्ल्याच्या पायथ्याजवळ लागून मोठ्या प्रमाणात लोकवस्तीसुद्धा आहे. त्यामुळे पाली शहरावर दरडीचे सावट आहे.
वाघजाई नगर येथे किल्ल्याच्या मातीचा भाग ढासळला. घटना झाल्यावर लागलीच नगरपंचायतीमार्फत येथे पाहणी करण्यात आली आहे. पालीतील सरसगड किल्ल्याला लागून वाघजाई नगर, वरचा देऊळवाडा, श्रीकृष्ण नगर, बेगरआळी, उंबरवाडी, सावंत आळी, राम आळी, मधली आळी तसेच तळई व दापोडे या आदिवासी वाडी तसेच ग.बा. वडेर हायस्कूल आणि पालिवाला महाविद्यालय आहे. त्यामुळे किल्ल्यावरून दरड कोसळल्यास येथे मोठा धोका संभवतो.
काही नागरिकांना पालीतील भक्तनिवास येथे हलविण्यात येणार आहे. तेथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. शिवाय, अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीस देखील पाठविल्या आहेत. नागरिकांनी दक्ष व सुरक्षित राहावे.
विद्या येरूनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत पाली