मोतिराम पाटील यांना पंडित पाटील यांच्याकडून श्रद्धांजली
। मुरुड । वार्ताहर ।
मरावे परी कीर्ती उरावे असे हे थोर मोतिराम पाटील म्हणजेच शेकापक्षाचा ज्येष्ठ नेता हरपला आहे. अथक प्रयत्न करून एक कोटीची पाणी योजना त्यांनी गावासाठी मिळवली. श्रीराम नवमीला सर्वात मोठी रामाच्या पालखीची मिरवणूक त्यांनी सुरु केली. मीनाक्षी पाटील मच्छिमार मंत्री असताना त्यांनी कोळी समाजाला अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांचा शोकसभेला सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते, हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. मोतिराम पाटीलांनी समाजसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे, असे उद्गार माजी आ. पंडित पाटील यांनी एकदरा येथे दि. 18 मार्च रोजी आयोजित त्यांच्या शोकसभेत काढले.
पांडुरंग आगरकर यांनी मोतिराम पाटील यांच्या कार्याचा आढावा विशद केला. मच्छिमार संघ अध्यक्ष रविकांत पेरेकर म्हणाले, मोतिराम पाटील यांच्यासारखा खंबीर, निर्भीड, सच्चा नेता आता होणे नाही. मोतिराम पाटील हे शेकापचे करारी, निष्ठावान नेते होते. सामुदायिक विवाहाची प्रथा त्यांनी सुरु केली व कमीत कमी खर्चात शेकडो विवाह पार पाडले, असे मनोज भगत म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत, रा.कॉ. तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शिवसेनेचे प्रमोद भायदे, चेअरमन पांडुरंग आगरकर, सुधाकर दांडेकर, प्रणाली मकू आदी मान्यवर उपस्थित होते. पांडुरंग आगरकर यांनी शोकसभेचे सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रदर्शन केले. या शोकसभेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.







