| अलिबाग | प्रतिनिधी |
शोषित, पीडित व वंचित घटकांच्या चळवळीत काम करणारे अनेकजण आहेत. या चळवळीत काम करणारे शेकापचे नेते हे एक आकर्षण केंद्रबिंदू आहेत. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील आज राज्याच्या राजकारणात काम करीत आहेत. काही माणसे पदांमुळे मोठी होतात, काही पदे माणसांमुळे मोठी होतात. तर, काही निव्वळ माणसांमुळे मोठी झालेली असतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जयंत पाटील आहेत. त्यांचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे. वंचित, शेतकरी, कष्टकरी, कामगार, उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी जयंत पाटील एक लढणारे नेते आहेत.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात जोरदार मांडणी करण्यासाठी शेकापचे नेते जयंत पाटील विधिमंडळात हवे होते. मोठ्या ताकदीने या विधेयकावर ते बोलले असते. देशासह राज्यात नवी समाजाची पुनर्बांधणी केली जात आहे. त्यासाठी जयंत पाटील यांची गरज आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
पुरोगामी विचार टिकला पाहिजे: आ. डॉ. बाबासाहेब देशमुख
अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह गेल्या काही वर्षांपूर्वी बांधले होते. या नाट्यगृहामध्ये जीवनातील पहिले भाषण केले आहे. त्यानंतर आज याच नाट्यगृहामध्ये भाषण करण्याची संधी मिळाली आहे. पुरोगामी युवक संघटनेचा अध्यक्ष म्हणून शेकापचे नेते जयंत पाटील यांनी जबाबदारी सोपविली. अध्यक्ष म्हणून काम करीत असताना खूप चांगल्या पद्धतीने सन्मान मिळाला आहे. पीएनपी नाट्यगृहाप्रमाणे अन्य जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये नाट्यगृहांची निर्मिती होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहता, पुरोगामी विचार पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा विचार टिकला पाहिजे. त्यासाठी शेकापचे नेते जयंत पाटील सभागृहात असणे आवश्यक आहे. भाई पुन्हा विधानपरिषदेमध्ये दिसतील, असा विश्वास यांनी व्यक्त करीत शेतकरी कामगार पक्ष पुन्हा उंच भरारी घेईल, असे देशमुख म्हणाले.