| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमधील पांडवकडा भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे समजले होते. परंतु, तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे मागील डॉगर परिसरामधून बिबट्याने कारागृहाच्या वसाहत परिसरात शिरकाव केल्याचे कारागृह अधिकारी-कर्मचारी यांना आढळून आले. त्यामुळे रात्रीचेवेळी कर्तव्यावर येणारे व सुरक्षा गस्तीसाठी ये-जा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, सर्वजण बिबट्याचे दहशतीखाली कर्तव्य बजावत आहेत. कारागृह परिसरामधील अधीक्षक बंगला वगळता आजूबाजूस कोणीही निवासी नसल्याने शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असलेले अधीक्षक व त्यांचे कुटुंबिय यांचे जिवितास धोका निर्माण झालेला असून, लवकरात लवकर या बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडणे आवश्यक झाले आहे.
तळोजा मध्यवर्ती कारागृहाची परिसरात मागील बाजूस अधीक्षक बंगला असून सद्यस्थितीत तेथे कारागृह अधीक्षक हे सहकुटुंब वास्तव्यास आहेत. अधीक्षक बंगल्याचे सुरक्षेकरीता दिवसपाळीत व रात्रपाळीत कर्मचारी नेमलेले असतात. सदरचा बंगला हा डोंगर पायथ्याशी असून, आजूबाजूला जंगलासारखी दाट झाडी आहे. तसेच अधिकारी-कर्मचारी वसाहत इमारत या राहण्यास धोकादायक असल्याने सर्व इमारती रिक्त आहेत. परिणामी कारागृहाचे मागील परिसरातील वसाहतीमध्ये माणसांची वर्दळ नाही. यामुळे वसाहत परिसरामध्ये अजगर, घोणस, मण्यार, नाग, इ. विषारी साप तसेच रानडुक्कर, तरस, बिबट्या या वन्य प्राण्यांचा वावर होत असल्याचे आढळून आलेले आहे. बिबट्यास पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा लावणेकरीता व आवश्यक उपाययोजना तातडीने करणेबाबत वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल यांना कारागृह प्रशासनाने लेखी पत्रांन्वये विनंती केलेली असून त्यांनी देखील पाहणी करुन ट्रॅप कॅमेरे बसविलेले आहेत. बिबट्या जेरबंद होईपर्यंत अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावीत आहेत.






