वैदर्भी खेळाडूंसाठी ‘थोडी खुशी जादा गम’

| नागपूर | प्रतिनिधी |

यंदाच्या आयपीएलमध्ये विदर्भाचे जवळपास अर्धा डझन क्रिकेटपटू विविध फ्रेंचाइसींकडून खेळले. मात्र, एका-दोघांचा अपवाद वगळता इतरांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा वैदर्भी खेळाडूंसाठी ‘थोडी खुशी जादा गम’ अशीच काहीशी ठरली आहे.

यावर्षीच्या आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादवसह यष्टीरक्षक जितेश शर्मा, सलामीवीर अथर्व तायडे, मध्यमगती गोलंदाज यश ठाकूर, दर्शन नळकांडे आणि आक्रमक फलंदाज शुभम दुबे यांनी विविध संघांचे प्रतिनिधित्व केले. परंतु नजरेत भरेल, अशी एकानेही कामगिरी बजावली नाही. यश लखनौकडून खेळताना एका सामन्यात पाच गडी बाद केले, तर जितेशला अनपेक्षितरित्या पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हीच समाधानाची बाब म्हणता येईल. आपल्या शानदार कामगिरीने गतवर्षी जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकणारा अमरावतीचा जितेश यावर्षी अपेक्षावर खरा उतरू शकला नाही. त्याला 14 सामन्यांमध्ये 131.69 च्या सरासरीने केवळ 187 धावांच करता आल्या. तर यष्टीमागे 13 झेल टिपले. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात भूषविलेले कर्णधारपद ही एकमेव त्याच्यासाठी आनंदाची बाब ठरली.

क्रिकेट जगतात विदर्भ एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेश यादवलाही छाप सोडता आली नाही. सुरवातीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या अनुभवी उमेशला गुजरात टायटन्सकडून सात लढतीमध्ये केवळ आठच बळी टिपता आले. गोलंदाजीत त्याला सुरच गवसला नाही. यश ठाकूरने गुजरातविरुद्धच्या सामन्यात पाच बळी टिपून आशा उंचावल्या खऱ्या, पण त्यानंतर त्यालाही सातत्य कायम राखता आले नाही. यश स्पर्धेतील दहा लढतीत केवळ अकरा फलंदाजच बाद करू शकला. गुजरातकडून खेळणारा अन्य एक गोलंदाज दर्शनची तीन सामन्यांमध्ये तीन बळी अशी निराशाजनक कामगिरी ठरली. तर पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अथर्वलाही दोन सामन्यांमध्ये केवळ 61 धावाच काढता आल्या. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा वैदर्भी खेळाडूंसाठी आनंद कमी निराशाच जास्त राहिली.

संधीचे सोने करण्यात शुभम दुबेही अपयशीराजस्थान रॉयल्सने तब्बल 5 कोटी 80 लाख रुपये मोजून विदर्भाचा युवा फलंदाज शुभम दुबेला खरेदी केले होते. मात्र तोदेखील संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला. डावखुऱ्या शुभमला चार सामन्यांमध्ये फक्त 31 धावा करता आल्या. तथापि पहिल्या आयपीएल अनुभवातून आपण खूप काही शिकल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पुढील वर्षी नक्कीच त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येईल.

Exit mobile version