पोयनाड भागात निष्ठेने व जिद्दीने शेकापक्षाला वाहून घेतलेले जे कार्यकर्ते व हितचिंतक होते, त्यातील एक प्रमुख कार्यकर्ता म्हणजे वसंत गुरुजी. गेल्या आठवड्यात वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पक्षाशी निष्ठा, जिद्द काय असते, हे नव्या पिढीला कळावे, यासाठी त्यांचे कार्य पोहोचविण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेख मी लिहितोय.
सध्याची परिस्थिती पाहता आता निष्ठा संपली आहे. आपल्यासाठी झटलेल्या, मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांची जाणीव नवीन पिढीमध्ये राहिली नाही. त्याकाळी वसंत गुरुजी रोज सकाळी सात वाजता जनतेची कामे घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी माझे वडील स्व. प्रभाकर पाटील व मला भेटण्यासाठी येत. वसंत गुरुजी म्हणजे शेकडो नागरिकांची रोजगाराची, विकासाची कामे घेऊन येणारा एक जिद्दीचा व कडवट शेकापचा कार्यकर्ता होता. शेकापच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा होता आणि आजही आहे. खारेपाटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या फौजेमध्ये अमरनाथ मास्तर, मारुती सर, अमृत पाटील अशा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावे घेता येतील. अशा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे पक्षाप्रती असलेले प्रेम, पक्षाच्या अस्तित्वासाठी असलेली धडपड, आपुलकी मी लहानपणी बघितली. माझ्या लहानपणी सांबरी-शिहू हा रस्ता अस्तित्वात नव्हता. त्यामुळे लोकं होडीने प्रवास करीत होती. त्यावेळी वसंत गुरुजी तत्कालिन सरपंच शेळके यांना घेऊन आले. मी व वडील स्व. प्रभाकर पाटील जीपने बांध तोडून शिहूला पोहोचलो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी सुरु केली. त्यानंतर सरपंच शेळके वसंत गुरुजींना घेऊन आले व शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. वसंत गुरुजींमुळेच शिहू हायस्कूल उभारण्यात आले. त्या विभागात त्यांचे अफाट कार्य होते. अनेक विकासाच्या कामांमध्ये, संघटनेमध्ये खिशातले पैसे खर्च करुन काम करणारे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. सरकारी नोकरीत असतानाही त्यांनी नियमांत राहून पक्षाचे काम केले. हे सारे करीत असताना त्यांनी कुठलीही अपेक्षा केली नाही, याचा विसर शेकापला तसेच व्यक्तिगत मला कधीही पडणार नाही. वसंत गुरुजी हे उत्तम मार्गदर्शक होते. कधी चूक झाली तर कान धरण्याचा अधिकारही त्यांना होता.
सांप्रतच्या राजकारणात पक्षाने दिलेली संधी, निष्ठा, पक्षासोबत असलेली बांधिलकी नवीन पिढी विसरत चालली आहे. याबाबतची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली. वसंत गुरुजींनी संपूर्ण कुटुंब कायम पक्षासोबत ठेवण्याची कामगिरी केली. त्यांनी शेकापच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम धडपड केली, हे मी व कार्यकर्ते विसरणार नाही. मला वाटतं त्यावेळी कुर्डूसहून पोयनाडला येण्यासाठी सकाळी सहा वाजता गाडी असायची. ती चुकलीच तर चालत 10 किलोमीटर येणारे वसंत गुरुजी व जनार्दन शेळके यांना मी लहानपणी बघितलं. म्हणूनच अशा कार्यकर्त्यांचा सन्मान व अभिमान पक्षाला कायम असून, त्यांचे कार्य माझ्यासारखा कार्यकर्ता विसरणार नाही.
आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती बदलली आहे. पक्षाने ज्यांना मोठे केले, कुवत नसतानाही ज्यांना पदे दिली, मोठे झाले, ते निष्ठेला विसरले आहेत. मात्र, एक काळ असा येईल, जे वसंत गुरुजींसारखे कार्यकर्ते असतील, त्यांच्या कामाची आठवण काढली जाईल, याची खात्री आहे. वसंत गुरुजी यांनी स्वखर्चाने जनतेची कामं केली. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आम्हाला कायमच अभिमान वाटला आणि म्हणूनचा त्यांचा शब्द आम्ही कधीच खाली पडू दिला नाही.
वसंत गुरुजींच्या निधनसमयी मी परदेशात होतो. परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. हा त्यांचा सन्मान असून, त्यांच्या कामाची पोचपावती आहे. हे सारे पाहून मी क्षणभर भारावून गेलो. पद मिळाले नाही म्हणून तो नाराजी व्यक्त करु शकतो, मात्र पक्षत्याग करु शकत नाही, याचे मूर्तीमंत उदाहरण त्यावेळी दिसले. जनता विसरत नाही. सर्वसामान्यांना वसंत गुरुजी यांच्या कार्याचा विसर पडलेला नाही, याची जाणीव त्यावेळी झाली. पक्षासोबत असलेली निष्ठा, आपुलकी, त्यांचे कार्य याबाबतची जाणीव नवीन पिढीनेही ठेवावी, अशी यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो.