ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला जीवदान

ओहोटीमुळे किनाऱ्यावर वाहून आल्याचा अंदाज

| अलिबाग | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथील फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलावर एक मोठे कासव वाहून आले. याबाबतची माहिती तिथे काम करणाऱ्या आकाश पाडलेकर यांनी दक्षिण कोकण वनविभाग कांदळवन कक्षाच्या कार्यालयाला दिली. त्यानंतर अधिनस्त वनरक्षक, कासव तज्ज्ञ व कासव मित्र यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ते ग्रीन सी या प्रजातीचे नर कासव असल्याचे लक्षात आले. या कासवाला वनविभाग आणि कासव संवर्धन प्रकल्पाच्या सदस्यांनी जीवदान दिले.

रायगड जिल्ह्यात सागरी क्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात, त्या अनुषंगाने या प्रजातीचा त्यात समावेश आहे. परंतु, श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथे प्रथमच नर ग्रीन सी कासव वाहून आल्याचे कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांच्या निदर्शनास आले. या ग्रीन सीटर्टल कासवाचे अंदाजे वजन 200 किलो असून त्याची लांबी 190 सेंमी, पाठीची लांबी 65 सेंमी, रुंदी 62.5सेंमी आणि शेपटी 36 सेंमी इतकी होती. पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर वाहून आले होते. वन कर्मचारी यांनी कासवाची तपासणी केली असता, त्याला कुठेही दुखापत झाल्याचे आढळून आले नाही.

या कासवाला मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर व हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर कासव मित्र आणि कांदळवन विभागाचे अधिनस्त वनरक्षक तुषार बाप्पासाहेब भटे, ऋषिकेश लव्हटे, कासव तज्ज्ञ मोहन उपाध्ये, स्थानिक ग्रामस्थ आणि फेरी बोटीवर काम करणाऱ्या मुलांच्या साहाय्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. अशा प्रकारचे नर ग्रीन सी टर्टल कासव पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीला लागले. यापूर्वी आसपासच्या किनाऱ्यावर किंवा खाडीत ग्रीन सीटर्टलच्या माद्या आढळल्या आहेत. परंतु, नर कासव सापडले अथवा आढळले अशी ही पहिलीच घटना रायगड जिह्यातील बागमांडला येथे घडली आहे. अशाप्रकारे समुद्री कासव आढळल्यास त्वरीत कांदळवन विभागास कळविण्यात यावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकण श्रीमती कांचन पवार यांनी केले आहे.

Exit mobile version