आमदार अपात्रता याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी होणार

| मुंबई | वृत्तसंस्था |

विधानसभेत मंगळवारी आमदार अपात्रता सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी दोन्ही वकीलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. दिवसभराचे आजचे कामकाज संपल्याने आता बुधवार, 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना सुनावणी पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून मॅरेथॉन सुनावणी करण्यात येणार आहे. बुधवार 22 नोव्हेंबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी पार पडणार आहे.

शिंदे गटाचे वकील ॲड. महेश जेठमलानी यांनी दिवसभराच्या सुनावणीत ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना अडचणीचे प्रश्न विचारले. मात्र, प्रभू यांनी संयमी उत्तरे दिली. शिवसेनेच्या आमदारांनी दाखल केलेल्या 34 याचिकांचे सहा गट करून ही सुनावणी घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळमर्यादा पाळली नाही, तर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चित तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version