अंतरवाला सराटी घटनेच्या निषेधार्थ कळंब येथे मोर्चा

मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध

| नेरळ | वार्ताहर |

जालना जिल्ह्यातील अंतरवाला सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला हल्ला या प्रकरणाचे पडसाद कर्जत तालुक्यात उमटले आहेत. मराठा समाजातर्फे कळंब येथे निषेध मोर्चा काढण्यात आला, यावेळी सरकारचा निषेध करत दोषींवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्या घटनेचा मराठा समाजाच्या वतीने जागोजागी निषेध केला जात आहे. कर्जत तालुक्यातील कळंब परीसरातील मराठा समाजाच्या शेकडो तरुणांनी एकत्र येत या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरुणांची गर्दी जमली होत्या. त्यामुळे नेरळ पोलिसांनी मोठी कुमक बंदोबस्त करण्यासाठी मागविली होती. यावेळी मराठा समाजाच्या उपोषण कर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

Exit mobile version