। ठाणे । प्रतिनिधी ।
भिवंडी तालुक्यात पती आणि सासूकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली हेमंत पाटील (28) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिचे माहेर भिवंडी तालुक्यातील जुनांदुरखी गावात आहे. रुपालीचे लग्न पिंपळघर येथील हेमंत पाटील याच्याशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता पण काही महिन्यांनंतर पती हेमंत पाटील कर्जबाजारी झाल्याचे सांगून रुपालीकडे माहेरून पैसे आणण्याची सतत मागणी करू लागला असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पैशांच्या कारणावरून पतीकडून शिवीगाळ, मारहाण केली जात असल्याचे तसेच सासू शोभा पाटील हिने देखील वारंवार मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केले आहेत. या वारंवार होत असलेल्या त्रासामुळे रुपाली मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. मृत महिलेचे महिलेचे वडील रामचंद्र पाटील (57) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या छळाला कंटाळून रुपालीने खाडी किनाऱ्यावर जाऊन पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी तो शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोनगाव पोलीस करत आहे.





