गवंड्याची मुलगी झाली दंतचिकित्सक

पुणे जिल्ह्यात डेंटल पदवीत प्रथम

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आगरवाडा गावची सुकन्या रितू नारायण नाक्ती हिने डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरीमधून डेंटल पदवी मिळून पुणे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. रितूचे वडील नारायण काशिनाथ नाक्ती यांनी गवंडी काम करीत आपल्या मुलीला शिक्षण दिले. रितूने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वरवठणे-आगरवाडा येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतून पूर्ण केले.

पुढील शिक्षणासाठी तिने पिंपरी-पुणे जाणे पसंत केले. डेंटल पदवीमध्ये तिने पुणे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. आपल्या आई-वडिलांसह गावाचे, तालुक्याचे, शाळेचे पर्यायाने संपूर्ण जिल्ह्याचे नाव तिने उज्वल केले. या पुढेही शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्याचा मनोदय रितूने आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केला. नारायण नाक्ती हे अतिशय मेहनती असून काभाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना पुण्या सारख्या शहरामध्ये शिक्षण देऊन आपली जबाबदारी पार पाडली. आज श्रावणी सोमवारच्या शुभदिनी रितूचे अभिनंदन करून तिचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी तिचे वडील नारायण नाक्ती, आई नम्रता नाक्ती, चुलते सुनील नाक्ती, चुलती सुप्रिया नाक्ती, सुधाकर जंगम, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण जिल्ह्यातून रितूचे भरभरून कौतुक होत आहे.

Exit mobile version