| नवीमुंबई | प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची उपआयुक्त (सा.प्र.) कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी बैठक घेतली.
या बैठकीस उपआयुक्त (करमणूक) संजीव पालांडे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, बहुजन समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध पक्षाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी बुधवारी (दि.26 जून) रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा दिनांक निहाय कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व सूचना देण्याकरिता पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना निवडणूक कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. तसेच अनामत रक्कमे संबधित माहिती, नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाची कागदपत्रे, शपथ पत्रातील सूचना, आदर्श आचारसंहितेसंबधी माहिती, मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती याबाबत तपशीलवार माहिती दिली.
यावेळी निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे उपआयुक्त (सा.प्र.) कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी सोप्या शब्दात निरसन केले.