। तळा। वार्ताहर।
महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने तळा तहसील आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या माध्यमातून तळा कॉलेजमध्ये जनजागृतीपर माहिती व पथनाट्य सादर करण्यात आले. ‘सतर्क रहा, सुरक्षित रहा’ हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी आपत्ती व्यवस्थापनाची सहा सूत्रे सांगण्यात आली. संयम – आपत्ती कोणतीही असो मनावर ताबा ठेवून परिस्थितीनुसार कृती करणे गरजेचे असते. अफवा – गोंधळात भर घालणारा घटक. समाज माध्यमातून मिळालेल्या माहितीची सत्यता जाणून घेवूनच त्याप्रमाणे योग्य पाऊल उचलावे. भीती – आपत्तीला घाबरून न जाता धैर्य राखल्यास विपरित परिस्थितीलाही सामोरे जाता येते. सावधानता – कायम सावध असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण संभाव्य नुकसानाची तीव्रता कमी करू शकतो. ज्ञान – माणसाचा सर्वांत मोठा शत्रू अज्ञान, संकटप्रसंगी उपलब्ध संसाधनाचा वापर करून घेण्याचे ज्ञान असेल तर अनेकांचा जीव वाचू शकतो. सहकार्य – एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे एकमेकांचे सहकार्य असल्यास कोणत्याही संकटावर सहज मात करता येते. या सूत्रांचा योग्य उपयोग करण्याचा संदेश देण्यात आला. हे पथनाट्य तळा तहसील आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.







