शेकडो फोटो काढून मोबाईलमध्ये जपले; पर्यावरणचा समतोल राखण्याचा संदेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रत्येकाला काहीतरी नवनवीन करण्याचा छंद असतो. असाच एक आगळावेगळा छंद अलिबाग तालुक्यातील एका तरुणीला आहे. तीने गेल्या सहा वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिने निसर्गफोटो काढले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यास जाऊन तेथील निसर्ग, पक्षी, प्राणी व इतर छायाचित्र काढून आपल्या मोबाईलमध्ये साठवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न ती करत आहे. विशेष म्हणजे हा छंद ती आपली नोकरी सांभाळून करत आहे.
मोनिका औचटकर असे या तरुणीचे नाव असून ती अलिबाग तालुक्यातील उसर येथील रहिवाशी आहे. ती गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीमध्ये नोकरीला असून रामराज विभागात बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे. तसेच, या विभागात चांगले काम केल्याबद्दल मोनिका औचटकर हीचा अलिबाग प्रेस असोसिएशनच्यावतीने तेजस्वीनी पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा जिल्हाधिकारी जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता. मोनिका औचटकर हिला गेल्या सात वर्षांपासून मोबाईलमध्ये फोटो काढण्याची आवड आहे. तिने गडकिल्ल्यांसह वेगवेगळी फुले, फुलपाखरे, प्राणी, पक्षांचे फोटो काढून ते मोबाईलमध्ये साठवून ठेवण्याचा छंद गेल्या अनेक वर्षांपासून जपला आहे. तसेच, या छायाचित्रांमधून मोनिका हिने कायमच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यास गेल्यावर तेथील गडकिल्ले, किनारे, समुद्र, प्राणी, पक्षी यांचे फोटो काढण्याची आवड 2019 पासून निर्माण झाली. झाडे, फुले ही लाख मोलाची संपत्ती आहे. त्यांच्याकडूनदेखील भरपूर काही शिकण्यास मिळते. त्यामुळे प्राणी, पक्षी, फुले व झाडांचे फोटो काढण्याचा छंद गेल्या सात वर्षांपासून अद्यापपर्यंत जपला आहे.
– मोनिका औचटकर







