। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा येथून मित्रासह पनवेल येथे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.6) पहाटे नावडे ते रोडपाली येथील उड्डाणपुलावर घडली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
बाबूसिंह नाथुसिंह खरवड (22) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, त्याच्या जखमी मित्राचे नाव चत्तरसिंह असे असून हे दोघेही तळोजा फेज- २ मध्ये राहणारे आहेत. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बाबूसिंह हा त्याच्या मित्राकडे असलेला मोबाईल फोन घेण्यासाठी पनवेल येथे जात होता. त्यासाठी बाबूसिंह खरवड व त्याचा मित्र चत्तरसिंग हे दोघेही दुचाकीवरून पनवेल येथे जात असताना नावडे ते रोडपाली दरम्यानच्या उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी आली असताना हा अपघात झाला व दोघेही जखमी झाले. या दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता गंभीर जखमी झालेल्या बाबूसिंह याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.







