मोटारसायकलस्वारांना धूमस्टाईल अंगलट येणार

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागात काही तरुण बेदरकारपणे मोटोरसायकल चालवितात. अशा तरुणांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांनी दिली. त्यामुळे स्टंट मारणार्‍यांवर पोलिसांची नजर राहणार असून तरुण असे कृत्य करताना सापडल्यास त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. यासंदर्भात प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना सूचना देखील दिल्या आहेत.

काईंगडे यांनी सांगितले की, अशाप्रकारे बेदरकारपणे मोटरसायकल चालवणार्‍या तरुणांमुळे इतर सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात अशाप्रकारे कोणी सुसाट मोटरसायकल चालवत असेल तर त्याचे नाव नोंद करून ठेवणे. त्यानंतरही अशा प्रकारे बेदरकारपणे मोटरसायकल चालवताना तो मोटरसायकलस्वार आढळल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे म्हणाले. मानवी जीविताला धोका होईल, अशा प्रकारे वाहन चालवणे गुन्हा आहे. अशाप्रकारे कोणी मोटरसायकल चालवत असेल तर त्याचा व्हिडिओ देखील बनवावा व तो पोलीस ठाण्यात द्याव्यात, अशा सूचनाही काईंगडे यांनी पोलीस पाटील यांना दिल्या आहेत.

Exit mobile version