बीआरएसपुढे अडचणींचा डोंगर

| तेलंगण | वृत्‍तसंस्था |

तेलंगण आणि के. चंद्रशेखर राव ऊर्फ के. सी.आर. ही ओळख गेल्या दहा वर्षांपासून होती. राष्ट्रीय पातळीवर राजकारणात प्रवेश करण्यासाठी के.सी.आर यांनी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) केले. या नावानुसार त्यांनी तेलंगणच्या शेजारील राज्यांमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात नांदेडसह अन्य ठिकाणी जोरदार सभा घेतल्या. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चितपट झाल्यानंतर के.सी.आर राव आणि त्यांच्या पक्षाला आता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पक्षाचे नेते व आमदारही सोडून जाऊ लागले आहेत.

आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती झाल्यानंतर के. सी.आर. राव यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले होते. सरकार आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी, काँग्रेस व तेलुगू देशम पक्ष फोडण्यासाठी त्यांनी जे धोरण राबविले होते, तेच त्यांच्यावर आता उलटले आहे. विधानसभेत के.सी.आर यांचे 39 आमदार आहेत. पण ही संख्या कमी होऊ लागली आहे. कधी, कोणता आमदार काँग्रेसचा ‘हात’ धरेल याचा अंदाजही करू शकत नाही, अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देऊनही नेते अन्य पक्षांत प्रवेश करीत आहेत. राज्याच्या राजकीय पटलावर ‘बीआरएस’ची अशी अवस्था पहिल्यांदा पाहायला मिळत आहे.

तेलंगणमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. तीन पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर यशाची कमान कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेकडील राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यश देणारे राज्य म्हणून पक्षाचे लक्ष तेलंगणकडेच आहे. विधानसभेप्रमाणेच लोकसभेतही येथे जास्त जागा जिंकण्याची आशा पक्षाला आहे. 2019 मधील निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळाला होता. आताच्या निवडणुकीसाठी अद्याप पक्षाने 14 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. ‘बीआरएस’च्या नेत्यांना पक्षाकडे खेचण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या काही खासदारांना तिकीट दिले आहे.

बीआरएस पुढील अडचणी

नेते, आमदार अन्य पक्षांच्या शोधात

अनेक मतदारसंघात प्रभावी उमेदवारांची कमतरता

अनेक नेत्यांवर फोन टॅपिंगसह भ्रष्टाचाराचे आरोप

दिल्लीतील मद्य गैरव्यवहारात के.सी.आर यांची मुलगी के. कविता यांना ईडीकडून अटक

फोन टॅपिंगप्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांना अटक

विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) दारुण पराभव झाल्यानंतर तेलंगणमध्ये राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. विधानसभेनंतर वर्षभरातच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये ‘बीआरएस’ला पुन्हा उभे राहण्यासाठी वेळ लागणार आहे. विधानसभेतील मिळालेल्या एकतर्फी विजयाने काँग्रेसचा दबदबा वाढला आहे.

एम.ए.एस कुमार
Exit mobile version