| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर शनिवारी (दि.14) झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. दरम्यान, त्यांच्या विजयासह तिसरे तिसरे पर्व (2023-25) संपले आहे. आता लगेचच चौथ्या पर्वाला म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. येत्या चौथ्या पर्वात 9 संघांमध्ये एकूण 71 सामने खेळले जाणार आहेत.
17 जून रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेने चौथ्या पर्वाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर लगेचच 20 जूनपासून भारताला इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिकाही चौथ्या पर्वाचा भाग असून दोन्ही संघ या मालिकेपासून नव्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. तसेच, या मालिकेपासून शुभमन गिलच्या कसोटी नेतृत्वालाही सुरुवात होणार आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या चौथ्या पर्वात सर्वाधिक कसोटी सामने ऑस्ट्रेलिया संघ खेळणार आहे. ते दोन वर्षात 22 कसोटी सामने खेळणार आहेत, तर त्यापाठोपाठ इग्लंडं 21 कसोटी सामने खेळेल. या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणारी प्रतिष्ठेची ऍशेस मालिकाही पाहायला मिळणार आहे. ही मालिका 2025 च्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणार आहे.
भारतीय संघ या चौथ्या पर्वात एकूण 18 कसोटी सामने खेळणार आहे. त्यात मायदेशात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. तर इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे परदेशी दौरे करायचे आहेत. तिसऱ्या पर्वाचे विजेते दक्षिण आफ्रिका आपल्या चौथ्या पर्वातील मोहिमेला ऑक्टोबर 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहेत. त्यांना मायदेशात 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही कसोटी मालिका खेळायची आहे.
भारतासमोरील आव्हाने
भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या चौथ्या पर्वात इंग्लंडव्यतिरिक्त श्रीलंका आणि न्यूझीलंडचे दौरे करणार असून या दोन्ही दौऱ्यात प्रत्येकी 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. तसेच, भारताला मायदेशात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध प्रत्येकी 2 सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याबरोबरच भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 5 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. म्हणजेच येत्या दोन वर्षात भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडसह विजेत्या दक्षिण आफ्रिका या संघांचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे.







