दीक्षाकडून नवीन राष्ट्रीय विक्रम

लॉस एंजिलिस स्पर्धा, महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत यश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताची महिला खेळाडू के. एम. दीक्षा हिने लॉस एंजिलिस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमावर मोहोर उमटवली. तिने महिलांची 1500 मीटर धावण्याची शर्यत 4.04.78 अशी वेळ देत पूर्ण केली आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. ही स्पर्धा जागतिक अ‍ॅथलेटिक्स उपखंडीय ब्राँझ लेव्हल म्हणून ओळखली जात आहे. 25 वर्षीय के. एम. दीक्षा हिने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला. याआधी हरमिलन बेन्स हिने 2021मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 4.05.39 अशी वेळ देत पहिल्या क्रमांकाला गवसणी घातली होती.

दीक्षाकडून हा विक्रम मोडला गेला. याआधी दीक्षाने 2023मध्ये कलिंगा येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेमध्ये 4.06.07 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली होती. ही तिची सर्वोत्तम कामगिरी होती. दीक्षा गेली पाच वर्षे एस. के. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तसेच एम. पी. अकादमीत ती अ‍ॅथलेटिक्सचे बारकावे आत्मसात करीत आहे.

पारूलकडून निराशा
पारूल चौधरी हिने महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत पाचवा क्रमांक मिळवला. तिला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडता आला नाही. तिने 15.10.69 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली. अंकित हिला 15.28.88 अशा वेळेसह दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अविनाश साबळे दुसरा
अविनाश साबळे याने पुरुषांची पाच हजार मीटर धावण्याची शर्यत 13.20.30 अशा वेळेसह पूर्ण केली व दुसरा क्रमांक मिळवला; पण त्याला स्वत:चा विक्रम मोडता आला नाही. त्याने पाच हजार मीटर धावण्याची शर्यत 13.19.30 अशा वेळेसह पूर्ण करीत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
Exit mobile version