मराठीमोळ्या अविनाशचा अमेरिकेत डंका!

पाच हजार मीटर धावण्यात नवा विक्रम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अमेरिकेतील पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. या शर्यतीत त्याने 13 मिनिटे 19.30 सेकंद वेळ नोंदवली. याआधीची त्याची वेळ 13 मिनिटे 25.65 सेकंद होती. अर्थात, या शर्यतीत तो बाराव्या क्रमांकावर राहिला.

लॉस एंजलिस येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक फेस्टिव्हलमध्ये शनिवारी साबळेने आपली कामगिरी उंचावली. तीन हजार मीटर स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रम साबळेच्या नावावर आहे. स्टीपलचेस ही त्याची मुख्य शर्यत आहे. गेल्या वर्षीच्या राष्ट्रकुलमध्ये त्याने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. तो जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये याआधीच पात्र ठरला आहे.

पारुलचीही चमक

28 वर्षीय पारुल चौधरीने महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम रचला. पारुलने 15 मिनिटे 10.35 सेकंद वेळ नोंदवली. याआधीचा राष्ट्रीय विक्रम 15 मिनिटे 15.89 सेकंद होता. तेरा वर्षांपूर्वी प्रीजा श्रीधरनने ही कामगिरी नोंदवली होती. एकूण स्पर्धकांमध्ये पारुल नवव्या क्रमांकावर राहिली. साबळे आणि चौधरी दोन्ही सध्या अमेरिकेत सराव करीत आहेत.

प्रवीणचाही विक्रम

तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलने राष्ट्रीय विक्रम रचला. त्याचबरोबर तो या वर्षीच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठीही पात्र ठरला. क्युबामध्ये झालेल्या स्पर्धेत प्रवीणने 17.37 मीटर लांब उडी घेतली. याआधीचा विक्रम 17.30 मीटर होता. 2016मध्ये रणजित माहेश्‍वरीने हा राष्ट्रीय विक्रम रचला होता. त्याने मारलेली 17.37 मीटर उडी ही यंदाच्या मोसमातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. प्रवीण सध्या क्युबात सराव करीत आहे.

Exit mobile version