। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी सारख्या संकटावर मात करणारा शिहू येथील प्रयोगशील शेतकरी केशव म्हात्रे यांचा नवा पॅटर्न, तीनपट अधिक उत्पन्न देणार्या भाताच्या वाणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. कृषी विभागाने देखील म्हात्रे या शेतकर्यांने दोन वर्षे मोठ्या जिद्दीने व कष्टाने संशोधन केलेल्या भाताच्या वाणाची दखल घेतली असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल विशेष कौतुक केले.
कोकणातील शेतकर्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार फटका बसतोय. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी परतीचा तर कधी वादळीवार्याचा पाऊस यामुळे येथील शेतकरी वर्गापुढे संकटच संकट उभे असते. परंपरागत पद्धतीला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती हा भरघोस उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणार्या शिहू येथील शेतकरी केशव म्हात्रे यांनी एक अनोखे संशोधन करून नवीन भाताचे वाण तयार केले आहे.
सर्वसाधारण पाहिले तर भाताच्या कणसाला 200 ते 250 इतके दाणे असतात; परंतु संशोधन पूर्ण तयार केलेल्या कणसाला 500 ते 609 इतके दाणे व झुबकेदार लोंबी पहायला मिळते.केशव म्हात्रे यांनी आपल्या शेतात वाडा कोलम व प्रसन्न या जातीच्या रोपांची लागवड केली होती. त्यातून त्यांनी फुलोर्याच्या वेळेला प्रसन्न आणि कोलम रोपांचे परागीकरण करून एक नवीन वाण तयार केले. यावर्षी त्या पिकाची लागवड शेतात केली असून, प्रत्येक कणसामागे 500 ते 550 दाणे आले आहेत.त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत पेण तालुका कृषी अधिकारी लोकरे व त्यांचे सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी पाहणी करून प्रयोगशील शेतकरी केशव म्हात्रे यांचे कौतुक केले आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांना टिकून राहायचे असेल तर दोन बियानांचे परागिकरण करून नवीन वाणाचे जे संशोधन केले. खार्यापाण्यात भातपीक उध्वस्त होते, मात्र हे बियान खराब होत नाही, शिवाय तीन पट उत्पन्न येत आहे, या बियाणांत कोणतेही रासायनिक खत वापरले नाही, सेंद्रीय व नैसर्गिक पद्धतीचे हे बियाणे आहे.सर्व शेतकर्यांनी हे बियान लागवड करावे, गुराना देखील पोष्टिक आहार मिळतो, शिवाय पिक व काड़ी मजबूत असल्याने वारा व पावसात टिकून राहते.
केशव म्हात्रे, शेतकरी