। महाड। प्रतिनिधी ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव निधी समीर म्हात्रे असे असून, ही धक्कादाय घटना महाड येथे घडली. या घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
निधी म्हात्रे ही कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील शाळेत नववीमध्ये शिकत होती. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विविध आंतरशालेय स्पर्धा महाड येथे यावर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून कोकण एज्युकेशन सोसायटीचे अनेक विद्यार्थी महाड येथे दाखल झाले होते. 12 व 13 डिसेंबर अशा दोन दिवसांकरिता या स्पर्धा महाडमधील चांदे क्रीडांगणावर भरवण्यात आल्या होत्या. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी शहाबाज हायस्कूलची निधी म्हात्रे ही विद्यार्थिनी देखील महाड येथे आली होती. दुपारपासून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता. या कार्यक्रमा दरम्यान बक्षीस स्वीकारून परत येत असताना या विद्यार्थिनीला चक्कर आली व ती खाली कोसळली. तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निधीच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. निधीचे पालक महाड येथे दाखल झाल्यानंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. निधी म्हात्रे हिच्या आकस्मिक मृत्यूमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली व पारितोषिक वितरण समारंभावर दुःखाचे सावट पसरले होते.







