। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे पां.वा. काणे रत्नागिरी उपकेंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या सहयोगाने जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र 29 मार्चला शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी निःशुल्क असून, केवळ नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
चर्चासत्राच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांसाठी अल्पोपाहार, भोजन, चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय चर्चासत्रात सहभागी व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जगद्गुरू श्री शंकराचार्य हे सनातन संस्कृती आणि संपूर्ण भारत वर्षासाठी पूज्यस्थानी आहेत. भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता आणि अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरिता जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. भारताच्या एकात्मतेसाठी जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचे योगदान हे अमूल्य आहे. या सगळ्या गोष्टींवर या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.