गोदी नदीच्या पुलावरुन जीवघेणा प्रवास

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड वाशियांच्या समस्या संपता संपेना. या महामार्गांवरील कोलाड गोदी नदीच्या पुलाच्या कामात वापरण्यात आलेले लोखंडी सल्या बाहेर निघाल्या असून, यामुळे या मार्गानी प्रवास करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून, येथे असंख्य गावातील नागरिक ये-जा करीत असतात. या पुलाच्या बाजूनी कोलाड केंद्र शाळा व कोलाड हायस्कूलकडे जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे येथे शाळा कॉलेजचे विद्यार्थी ये-जा करीत असतात, यामुळे वर आलेल्या या लोखंडी सलई धक्का लागून पदाचारी व विद्यार्थ्यांना दुखापत होऊ शकते. कोलाड गोदी नदीवरील पुलावरील काम हे निकृष्ट दर्जाचे असून, यामुळे लोखंडी सलई बाहेर आल्या आहेत यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन संबंधितांनी याची पाहणी करून बाहेर आलेल्या लोखंडी सलईच्या जागी पुन्हा काँक्रिटीकरण करावे अशी मागणी प्रवाशी नागरिक यांच्याकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version