। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा बाजारपेठ परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इको कार (एमएच-05-एफव्ही-5305) मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जात होती. हे पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि अपायकारक असून, त्यांचे सेवन केल्याने गंभीर आजार किंवा दुखापत होण्याची शक्यता असते, हे माहीत असूनही आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत होता.
रसायनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी करीत आहेत.






