भेंडखळ खाडीत मृत माशांचा खच्च

उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील भेंडखळ गावा जवळ असलेल्या खाडीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारामुळे भेंडखळ ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून अशा घटना घडून सुध्दा सदर अज्ञात व्यक्तींवर का कारवाई होत नाही? पोलीस प्रशासन अशा घटना का रोखू शकत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. बाहेरील वाहने अंधाराचा फायदा घेऊन अर्ध्या रात्री केमिकल युक्त रसायनांचा साठा गुपचूपपणे खाडीमध्ये सोडतात. त्यामुळे पाण्यातील मासे, साप कासव आदी प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर अनेक मासे प्राणी मृत्युमुखी पडतात. आणी हीच मासे स्थानिक नागरीकांनी खाल्ली तर त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर व अवैध पद्धतीने रासायनिक द्रव्य भेंडखळ येथील खाडीत टाकणार्‍या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी.

-विजय भोईर, क्राईम कंट्रोल क्लब उरण
Exit mobile version