। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशविदेशातील पर्यटक येत असतात. हा किल्ला पाहण्यासाठी मुरुड शहरापासून फक्त 1 कि.मी. अंतरावर खोराबंदर आहे. पण या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अनेक तळीरामांनी अड्डा बनविला आहे. या ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच नेहमी दिसून येत असून बाटल्यांच्या फोडलेल्या काचा सापडत असल्याने पर्यटक व स्थानिकांना अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
या बंदरात दिवसभर पर्यटकांची रेलचेल असते. त्यानंतर सायंकाळी वाहतूक बंद केली जाते. एकदा अंधार पडला की या ठिकाणी तळीरामांची पावले दारुच्या बाटल्या, चकणा, पाण्याच्या बाटल्या, सोडा बॉटल व शितपेय घेऊन येऊ लागतात. या ठिकाणी कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने या तळीरामांचे चांगलेच फावते आहे. येतात तर येतात पण दारु पिऊन झाल्यावर काचेच्या बाटल्या फोडून वाटेतच टाकून जातात. त्यामुळे येणार्या पर्यटकांना व त्यांच्या वाहनांच्या टायरला काचा लागून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर ठिकाणी स्वच्छ वातावरण असल्याने पहाटेच्या वेळी मॉर्निंगवॉकला जाणार्यांना ही या कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी स्थानिक मच्छिमारसुद्धा रात्री अपरात्री जा-ये करीत असतात, त्यांनासुद्धा याठिकाणी फुटलेल्या बाटल्यांच्या काचा लागून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या संबंधित बंदर खात्याने या बंदरात येणार्या तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांतून होत आहे.