तळोजा एमआयडीसीतून धुराचे लोट

| पनवेल । वार्ताहर ।

रात्रीच्या वेळी हवेत रसायनयुक्त धूर सोडण्याचे प्रकार तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांकडून सुरूच आहेत. पावसाळा संपताच कंपन्यांकडून केला जाणार हा प्रकार समोर आला असून होणार्‍या या प्रदुषणामुळे खारघर, कामोठे, कळंबोलीतील रहिवासी दुर्गंधीने हैराण झाले आहेत.

जागतिक नकाशावर वेगळेपणातून छाप सोडणार्‍या खारघर शहराला राहण्यासाठी पसंती मिळत आहे. या भागात सिडकोच्या नागरी वसाहतींसह अनेक नामांकित बड्या बिल्डरांचे आलिशान घरांचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांबरोबरच खारघरची विविधतेने नटलेली निसर्गसंपदाही नागरिकांना आवडते; मात्र रात्र झाल्यानंतर खारघर शहरात येणारे धुराचे लोट नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. सेंट्रल पार्कपासून तळोजा जेलकडे जाणारा रस्ता, सेक्टर 36, सेक्टर 35, इनामपुरी गाव, पेठपाडा, रांजनपाडा आदी रहिवासी परिसरात संध्याकाळनंतर केमिकलयुक्त धुराचा खेळ सुरू होतो. खारघर नोडसह तळोजा वसाहत, कामोठे, कळंबोली, रोडपाली येथील रहिवासी रात्रीच्या वेळेस उठणार्‍या धुरामुळे पुरते हैराण झाले आहेत. अनेकदा तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपन्यांवर कसलीच कारवाई होत नसल्याने आता समाजमाध्यमांवरून प्रदूषण नियंत्रण मंडळावर आगपाखड केली जात आहे.

तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांकडून नियमबाह्य पद्धतीने वायू सोडले जातात, त्या धर्तीवर दोन दिवसांपूर्वीच एक संयुक्त बैठक झाली आहे. एमपीसीबी, एमआयडीसी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. रात्रीच्या वेळेस धूर सोडणार्‍या या कंपन्यांवर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच धूर सोडणार्‍या कंपन्यांवर या आधीसुद्धा कारवाई करण्यात आली आहे.

डी. बी. पाटील
प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
Exit mobile version