| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि.29) सकाळी पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यातील बोगीचा कंट्रोल आर्म अपर पार्ट तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित डबा स्पेअर केला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा स्थानक परिसरात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आल्यानंतर सव्वासात वाजण्याच्या सुमारास स्टेशन मास्टर आणि मुंबई कंट्रोलकडून संबंधित डब्यात तांत्रिक बिघाड असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर स्टेशन मास्टर झाकीर पालेकर व त्यांच्या तांत्रिक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सखोल तपासणी केली. तपासणीत एका वातानुकूलित डब्याच्या पुढील बोगीच्या ऑफ साईडवरील कंट्रोल आर्म अपर पार्ट तुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने डब्यातील सर्व प्रवाशांना इतर डब्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर संबंधित डबा गाडीतून वेगळा करण्यात आला. आवश्यक तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गाडी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे गाडीला 3 तास 16 मिनिटांचा विलंब झाला.
