गरोदर महिलेची हेळसांड; बाळ दगावले

आरोग्य अधिकार्‍यांवर कारवाईची कुटुंबियांची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या आदिवासी महिलेवर येथे उपचार न करता तिला उल्हासनगर येथे पाठवून देण्यात आले. त्यामुळे गरोदर महिलेची हेळसांड होऊन तिचे बाळ मृतावस्थेत जन्माला आले. दरम्यान, या प्रकरणाची जबाबदारी वैद्यकीय अधिकार्‍यांनी झटकली आहे. तर, दुसरीकडे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या पीडित कुटुंबियांनी केली आहे.

20 मार्च रोजी कर्जत तालुक्यातील लाखाची वाडी येथील गरोदर महिला संगीता विठ्ठल पवार या बाळंतपणासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना आम्ही या ठिकाणी बाळंतपण करू शकत नाही, असे सांगून उल्हासनगर येथील रुग्णालयात जाण्यास सांगितल्याचे कुटुंबियांनी सांगितले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयामधील रुग्णवाहिकेमधून त्यांना पाठवून देण्यात आले. सकाळी नऊ वाजता कर्जत उपजिल्हा रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका उल्हानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये बारा वाजण्याच्या सुमारास पोहोचली. तेथे संगीता पवार यांना असह्य कळा येत असतानादेखील रात्री आठ वाजेपर्यंत कोणतेही उपचार केले नाहीत, असा आरोप पवार कुटुंबियांनी केला आहे. उलट तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला पुढील रुग्णालयात न्यायला सांगितले, असे त्यांचे म्हणणे आहे.

शेवटी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संगीता पवार यांना रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले. तेथे संगीता पवार यांचे बाळंतपण झाले, पण जन्मलेले बाळ हे मृत होते. शेवटी त्यांना (दि.23) कळवा येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यावर सदर कुटुंब आपल्या घरी कर्जत लाखाची वाडी येथे पोहोचले. त्यानंतर (दि.24) कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक आरोग्य सेविका आली. त्यांनी संगीता पवार यांची तपासणी न करता एक केस पेपर देऊन त्या निघून गेल्या, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, संगीता पवार यांचे बाळंतपण करण्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालय यांनी हलगर्जीपणा दाखवला, असा आरोप पवार कुटुंबियांनी केला आहे. या कुटुंबाने राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन आपल्यावर केलेल्या उपचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आपल्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विठ्ठल पवार यांनी केली आहे.

आपण त्यावेळी रुग्णालयात उपस्थित नव्हतो. परंतु, मी खात्री केल्यावर असे निदर्शनास आले आहे की, सदर प्रकरणात आमच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची काहीही चूक नाही.

डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, कर्जत उपजिल्हा रुग्णालय

जर गरोदर आदिवासी महिलेची हेळसांड झाली असेल, तर आमच्याकडे लेखी तक्रार करा.

डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड-अलिबाग

संबंधित तक्रारीची दखल घेऊन त्या अनुषंगाने कमिटी स्थापन करुन योग्य ती चौकशी केली जाईल.

डॉ. हेमंतकुमार बोरसे, उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे

सदर पीडित आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्यामुळे हे बाळ दगावले आहे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अशा बेजबाबदार डॉक्टरांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.

दिगंबर चंदने
Exit mobile version