। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे जिल्ह्यातील पाबे घाटात एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातून 20 जणांचा एक ग्रुप ट्रॅव्हल्स बसने राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाला होता. सर्व पर्यटक उत्साहात गडकिल्ले भटकंतीसाठी निघाले असतानाच, पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि हवेली तालुक्याला जोडणाऱ्या पाबे घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पाबे घाटात ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट खोल दरीत कोसळली. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. दरीत कोसळताच गाडीचा मोठा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. रेस्क्यू टीमने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दरीत अडकलेल्या इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेली खाजगी बस दरीत कोसळली
