। कर्जत । वार्ताहर ।
माथेरानमधील शार्लोट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तलाव साफ न केल्यास मनसे 1 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.
नगरपालिकेच्या विनंतीनुसार डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून 26 जुलै रोजी लेक साफ करण्यात येणार होता. जीवन प्राधिकरणाचे लाखो रुपये खर्च वाचून तलाव साफ होणार होता. परंतू प्रशासनाच्या उदासीन धोरणातमुळे तलाव साफ झाला नाही. याबाबत प्रशासनाने नगरपालिकेला मोरबे धरणाची पहाणी न करताच खोटी माहीती पुरवून तलाव साफ न करण्याची सुचना केली असल्याचा आरोप संतोष कदम यांनी केला आहे.
आठ दहा वर्षांपासून तलाव साफ न केल्याने नागरिकांना अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होऊन त्याचा येथील पाणी पुरवठयावर परिणाम होतो. याबाबत गांभीर्याने लक्ष न दिल्यास मनसेतर्फे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.